छत्रपती शिवरायांची कन्या व जावयाचे समाधीस्थळ साडेतीनशे वर्षानंतरही जीर्णोद्धार च्या प्रतीक्षेत
अकलूज (प्रतिनिधी )छत्रपती शिवाजी महाराजांची थोरली कन्या सखुबाई आणि जावई महादजी नाईक-निंबाळकर यांच्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील दोन समाधीस्थळाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अतिशय भग्नावस्थेत व अवशेष रूपाने शिल्लक असलेल्या दोघांच्या समाधी आजही अस्तित्वात असल्या तरी त्या भग्नावस्थेत अखेरची घटका मोजत आहेत.
या ठिकाणी दोन मराठेकालीन बांधणीच्या लहान इमारती असून एका इमारतीवर घुमटाकृती बांधकाम दिसते. तर शेजारी एक लहान चौकोनी इमारत असून समोर दगडी तुळशी वृंदावन दिसते. या इमारतींच्या शेजारीच एका दगडी शिळेवर कोरलेल्या स्त्री-पुरुषाच्या दोन मानवी आकृती भग्नावस्थेत पडलेल्या आहेत. पती-पत्नीचे अग्निसंस्कार व सती जाणे यानंतर अशा पध्दतीची शिल्पे तयार केली जातात. अशीच स्त्री-पुरुषाची एका शिळेवरील लहान शिल्पे माळशिरसच्या मारुती मंदिरात पाहावयास मिळतात.
या सर्व पुराव्याच्या आधारे या दोन्ही समाधी महादजी निंबाळकर व सखुबाई निंबाळकर यांच्याच असाव्यात. असा अनेकांनी निष्कर्ष काढला आहे.उपेक्षेचे जिणे जगणाऱ्या या स्मारकांना अनेक ठिकाणी चिरा गेल्या आहेत. त्याचे दगड विटा अक्षरशः निखळले आहेत. आजूबाजूला काटेरी झुडपे वाढली आहेत.
छत्रपती शिवरायांची कन्या सखुबाई व जावई महादजी नाईक-निंबाळकर यांची स्मारके माळशिरस येथे अस्तित्वात आहेत. त्यांच्या निधनानंतर तीनशे वर्षांपूर्वीच ही स्मारके बांधण्यात आली. एखाद्या मंदिराप्रमाणे बांधलेल्या या स्मारकास नक्षीकाम केलेले शिखरही आहे.
पंढरपुरातील ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांनी या दोन्ही समाधीस्थळांचा शोध लावला असून,त्याबाबतचा तपशील त्यांनी लिहिलेल्या ‘सोलापूर जिल्ह्य़ाचा इतिहास’ (मराठा कालखंड) या ग्रंथात दिला आहे. त्यांच्या या संशोधनानंतर या स्मारकांची दुरवस्थेबद्दल मोठी ओरड झाली. यावर शासनाने २०११-१२ साली या दोन्ही स्मारकांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय जाहीर केला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत २२ नोव्हेंबर २०११ रोजी ८० लाख रुपये खर्चाच्या जीर्णोद्धाराच्या कामाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला. या प्रस्तावात दोन्ही समाधीस्थळांच्या दुरुस्तीसह संरक्षक भिंत बांधणे, पाण्याची व्यवस्था करणे तसेच परिसरात यात्री निवास उभारणे या कामांचा समावेश होता. परंतु जिल्हा नियोजन समितीकडे दाखल झालेल्या या प्रस्तावावर आजतागायत कसलीही कार्यवाही झाली नाही. प्रस्तावाची फाईल नियोजन समितीकडेच धूळ खात पडून आहे.
गेल्या काही वर्षापासून तर आता या इमारतीला तडे जाऊ लागले आहेत. दगडाचे चिरे नाहिसे झाले आहेत. माजलेल्या काटेरी बाभळींनी या वास्तूचा गळा आवळला आहे. छत्रपती शिवरायांची मुलगी आणि जावयांच्या स्मारकाची ही दुरवस्था पाहून अनेक अभ्यासकांची, शिवप्रेमीची मने हेलावून जात आहेत.ऐतिहासिक वास्तू, स्मारके यांचे जतन करणे ही काळाची गरज असताना आम्ही दररोज नवनवे पुतळे आणि स्मारके उभी करत चाललो आहोत, हा आमच्या गौरवशाली इतिहासाचा आणि इतिहासपुरुषांचा अवमान आहे. या स्मारकांचे जतन करत तिथे इतिहास मांडला तर नवी पिढी आमच्या या भूतकाळाशी जोडली जाईल.असे परखड मत इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
छत्रपती शिवरायांच्या आयुष्याच्या अखेरच्या वर्षात शिवरायांचे थोरले जावईमहादजी नाईक निंबाळकर यांनी अकलूजच्या किल्ल्यासवेढा दिल्यानंतर वेढा उठवूनमाघार घेताना महादजी निंबाळकर हे इ स १६७९चे आँक्टोबर ,नोव्हेंबर च्या दरम्यान झालेल्या लढाईत मारले गेले . महादजी निंबाळकर यांना विरगती प्राप्त झाली .महादजी निंबाळकर हे अकलूज येथे धारातीर्थी पडले. परंतु त्यांचे कलेवर मात्र माळशिरस येथे ओढ्याच्या काठी पडले होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना त्यांच्या पत्नी सखुबाई सती गेल्या होत्या
.सखुबाई आणि महादजी यांची समाधी माळशिरस गावालगत ओढ्याकाठी आजही दिसून येत आहे .समाधी समोर हात जोडलेली दोन शिल्प आहेत. दगडी बांधकाम असलेली ही समाधी काही वर्षांपूर्वी सुस्थितीत होती. परंतु आता मात्र ही समाधी भग्न होत चालली आहे.
काही दिवसानंतर मात्र केवळ अवशेष शिल्लक राहतील. त्यामुळे या समाधीचा जीर्णोद्धार होणे नितांत गरजेचे आहे.
चौकट :-.
*शिवप्रेमीना आवाहन.*
काही वर्षांपूर्वी अकलूज परिसरातील काही शिवप्रेमीनी एकत्र येऊन या समाधीचा जीर्णोद्धार करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरु केला होता.तसेच श्रमदान करून या परिसरातील काटेरी झुडपे काढून स्वच्छता देखील केली होती.या अनुषंगाने आता आपण ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी, समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी ऐतिहासिक समाधी जीर्णोद्धार समिती ची स्थापना करीत आहोत. परिसरातील ज्या शिवप्रेमी ना या शिवकार्यात सहभाग घ्यायचा आहे. त्यांनी 7841847458.या नंबर वर संपर्क साधावा.