माणसांनी पैशापेक्षा माणसे मिळविण्याचा चंग बांधावा : साहित्यिक चंद्रकांत निकाडे यांचा संदेश
कोडोली ( ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर ) / दिनांक १: ” प्रत्येकाच्या जीवनात नवनवीन संधी येत असतात. जीवनात पैशापेक्षा माणसे मिळविण्याचा चंग बांधत मिळालेल्या संधीचे सोने करावे”, असा संदेश पोहाळे ( ता. पन्हाळा ) येथील ज्येष्ठ साहित्यिक, अभिनेते चंद्रकांत निकाडे यांनी दिला.
येथील यशवंत शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या चौतिसाव्या वर्धापदिनानिमत्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी येथील श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त विनिता जयंत पाटील होत्या. यानिमित्त संस्थेचे सेक्रेटरी डॉ . जयंत पाटील, अध्यक्षा पद्मजादेवी पाटील आणि मानद सरसचिव व्हि. डी. पाटील यांनीही महाविद्यालयास वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पुंडलिक पाटील आणि प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील व्यासपीठावर होते. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, माजी आमदार (कै. ) यशवंत एकनाथ पाटील आणि (कै. ) प्रदीप पाटील यांच्या प्रतिमांची पूजा करण्यात आली. त्यानंतर भित्तिपत्रक स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.
त्याचप्रमाणे टेट व सीटीइटी पात्रताधारक यशस्वी आजी – माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. महाविद्यालयातील शिवाजी विद्यापीठाच्या आजीवन विभागातर्फे सुरू असलेल्या ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ यशवंत अर्धदैनिकाचे ‘ प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास पाहुण्यांच्या हस्ते अग्नीरोधक यंत्र भेट दिले.
अध्यक्षीय भाषणात विनिता पाटील म्हणाल्या,” ज्याप्रमाणे अग्नी स्वतः जळून दुसऱ्याला प्रकाश देतो त्याप्रमाणे माणसाला देखील स्वतः कष्ट घेवून दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश देता येतो. आमचा व आमच्या शिक्षण संस्थेचा नेहमी असाच प्रयत्न असतो. ”
याप्रसंगी प्राचार्य डॉ. विश्वनाथ पाटील,प्रा. गुलनास मुजावर ,माजी विद्यार्थी प्रा. डी. डी. पाटील, प्रा. प्रताप पाटील, अर्धदैनिक यशवंतचे संपादक डी. पी. पाटील, प्रिन्सिपल मंदार पसरणीकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अजित लोकरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एस. डी. रक्ताडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. वर्गप्रतिनिधी अनिरुद्ध कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. संजय जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास आजी – माजी विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापकांबरोबरच कार्यालयीन अधीक्षक एस. के. पाटील, कनिष्ठ लिपिक अनिल इंदुलकर, ग्रंथपाल विशाल शेवाळे आणि सेवक तानाजी मोहिते यांनी परिश्रम घेतले.