पाठीमागे अदृश्य शक्ती, आमचं ठरलंय -राम सातपुते राम सातपुते 23नोव्हेंबर ला अदृश्य होतील -उत्तम जानकर अकलूज (प्रतिनिधी )संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागलेल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात सध्या चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.माळशिरस विधानसभा मतदासंघात एकूण 12उमेदवार रिंगणात उभे आहेत.मात्र खरी लढत ही विद्यमान आमदार राम सातपुते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांच्यात होत आहे.
दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दररोज गावभेट दौरे सुरु आहेत.2019च्या निवडणुकीत भाजपचे राम सातपुते यांनी उत्तमराव जानकर यांचा 2500मतांनी पराभव केला होता.परंतु त्यावेळी राम सातपुते यांच्या सोबत संपूर्ण मोहिते पाटील कुटुंब उभे होते.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे मात्र अद्याप भाजपा मध्येच आहेत.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात एकूण 3लाख 38हजार मतदार आहेत.त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे जवळपास 2लाख 20हजार मतदार हे मराठा समाजाचे आहेत.तर अनुसूचित समाजाचे 60हजार मतदार आहेत. याशिवाय धनगर समाजाचे मतदार देखील बहुसंख्येने आहेत.या निवडणुकीत भूमिपुत्र हवा म्हणून अनुसूचित समाजाने सुरवातीपासून दोन्ही उमेदवारांना विरोध केला आहे. अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.शिवाय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे सांगितल्यामुळे तालुक्यातील मराठा समाज नेमके कोणाच्या पाठीमागे उभा राहणार. हा प्रश्न देखील अनुतरीत आहे. तसेच अनुसूचित समाज कोणाला मतदान करणार. यावर बरेचसे गणित अवलंबून आहे.
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांनी आपल्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे. आमचं ठरलय असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे निश्चितपणे विजय आपलाच होणार असल्याचे ते सांगत आहेत. तर आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर हे मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत. त्यामुळे मिच निवडून येणार असे सांगत आहेत. त्यामुळे नेमके कोण निवडून येणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
विद्यमान आमदार राम सातपुते यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. माढा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोहिते पाटील यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात आला. धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभेची निवडणूकही जिंकली. यावेळी उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांची साथ दिली होती. त्याची परतफेड म्हणून मोहिते पाटील विधानसभा निवडणुकीत जानकर यांना मदत करणार असेही ठरले होते. त्यामुळे दिलेला शब्द पाळत मोहिते पाटील परिवाराने आपली ताकद उत्तमराव जानकर यांच्या पाठीमागे उभी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत जानकर आणि मोहिते पाटील एकत्र असूनही महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना 65000 वर मते मिळाली होती.उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष आहे. गेल्या निवडणुकीत मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना मदत केली होती. त्यामुळेच सातपुते निवडून आले असेही बोलले जात होते.
अदृश्य शक्ती, आमचं ठरलय या राम सातपुतेंच्या वक्तव्यावर संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागले आहे. अदृश्य शक्ती कोण? काय ठरलय? हा प्रश्न देखील माळशिरस तालुक्यातील विरोधकांना पडला आहे.राम सातपुते यांच्या माध्यमातून या मतदार संघात चांगली कामे झालेली आहेत. सर्वसामान्य नागरिकसुद्धा हेच बोलू लागला आहे.आणि हिच आपल्या कामाची पोचपावती असून कार्यकर्त्यांनी सक्षमपणे या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. आपण आपले काम प्रामाणिकपणे करायचे आहे असेही सातपुते म्हणाले.
दरम्यान आता दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप होत आहेत.राम सातपुते हे आपल्यामागे अदृश्य शक्ती आहे. असे सांगत आहेत. तर उत्तम जानकर हे येत्या 23नोव्हेंबर ला राम सातपुते हे अदृश्य होतील असे आपल्या भाषणातून सांगत आहेत.त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.