माळशिरस विधानसभा मतदारसंघात चूरशीच्या लढतीत उत्तमराव जानकर विजयी




अकलूज (प्रतिनिधी )संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागलेल्या माळशिरस या राखीव मतदारसंघात 3,49,568 पैकी 2,40,851मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.1,27,939पुरुष तर 1,12,897 महिलांनी मतदान केले.68.90%मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले.तब्बल 1,20,000मतदारांनी मतदान केले नाही.
निवडणूक जाहीर झाल्यापासून हा मतदारसंघ चर्चेत होता. या मतदारसंघातून 12उमेदवार रिंगणात होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचेकडून उत्तमराव जानकर तर भाजपा कडून विद्यमान आ. राम सातपुते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.सुरवातीपासून प्रमुख दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करीत प्रचाराला सुरुवात केली होती.वास्तविक पाहता ही निवडणूक राम सातपुते व उत्तमराव जानकर अशी न होता, मोहिते पाटील गट व मोहिते पाटील विरोधक अशीच झाली.ही निवडणूक सुरवातीला एकतर्फी वाटत होती. परंतु ती अतिशय चूरशीची झाली.
लोकसभा निवडणूक च्या वेळी मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले उत्तमराव जानकर व मोहिते पाटील यांनी 40वर्षाचे राजकीय वैर संपवून एकत्र आले. त्याची परिनीती म्हणून धैर्यशील मोहिते पाटील हे विक्रमी मतांनी माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. यावेळी मोहिते पाटील यांनी जानकर यांना तुम्हाला माळशिरस विधानसभा मतदार संघातून निवडून आणू असा शब्द दिला होता. तो शब्द मोहिते पाटील परिवाराने तंतोतंत पाळला.
मोहिते पाटील व जानकर अशा दोन गटाच्या विरोधात माळशिरस विधानसभा मतदारसंघात एकहाती निकराने लढत दिलेल्या राम सातपुते यांनी अगदी पहिल्या फेरीपासून १६ व्या पेरीपर्यंत आपल्या मतांची आघाडी कायम ठेवण्यात यश मिळवले. सुरूवातीपासूनच राम सातपुते यांनी मताधिक्य घेण्यास सुरूवात केल्याने सातपुते यांनी तुतारीची धाकधूक वाढवली होती.तब्बल साडे आठ हजार मते अधीक होती.परंतु जसजसे अकलूजपासून पुर्वेकडील गावे सुरू झाली, तसतशी उत्तम जानकर यांचे मताधिक्य वाढत गेले आणि सरते शेवटी जानकरांना वेळापूर परिसरातील गावांनी तारल्याने विजयाची माळ जानकरांच्या गळ्यात पडली. पहिल्या फेरीला जानकर यांनी १९ मतांची आघाडी घेतली होती. तेव्हा मोहिते-पाटील यांची ताकद मिळालेली आणि तालुक्याच्या पश्चिम भागात धनगर समाजात चांगलेच प्रसिध्द असणारे जानकर शेवटपर्यंत मताधिक्यावर राहतील असा अंदाज होता. परंतु दुसऱ्याच फेरीमध्ये सातपुते यांनी ११५ मतांचे मताधिक्य घेऊन अगदी १६ व्या फेरीपर्यंत आपले मताधिक्य अबाधित राखत तालुक्याच्या पश्चिम भागात केलेल्या आपल्या कामाची चुणुक दाखवून दिली. ११ व्या फेरीअखेर सातपुते यांना ८ हजार ५३० मताधिक्य होते.
त्यानंतर माळशिरस पुढील गावांची मोजणी सुरू झाली. त्यानंतर सातपुते यांचे मताधिक्य हळूहळू कमी होऊ लागले. १७ व्या फेरीमध्ये सातपुते यांचे मताधिक्य संपून जानकरांना ९० मतांची आघाडी मिळाली. तेथून पुढे २५ व्या फेरीपर्यंत जानकरांनी आपले मताधिक्य अबाधित ठेवत सुमारे १३ हजार १४८ मतांनी सातपुते यांच्यावर विजय संपादन केला. माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २ लाख ४० हजार ८५१ इतके मतदान झाले. यामध्ये राम सातपुते यांना १ लाख ८ हजार ५७ मते मिळाली तर उत्तमराव जानकर यांना १ लाख २० हजार ३२२ मते मिळाली.
जानकरांच्या विजयामध्ये धानोरे, उघडेवाडी, शेंडेचिंच, मळोली, काळमवाडी, पळवणी, बचेरी, साळमुखवाडी, खंडाळी व इतर गावांनी चांगले मताधिक्य दिले. सदर मतमोजणी अकलूज येथील वखार महामंडळ च्या गोडाऊन मध्ये सुरळीत पणे पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विजया पांगारकर व सहाय्यक म्हणून तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी काम पाहिले.कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी आपल्या सहकार्याना सोबत घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता.
चौकट :-
*मोहिते पाटील यांच्या मुळेच विजय .*
मोहिते पाटील परिवारातील विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील,संग्रामसिंह मोहिते पाटील,शिवतेजसिंह मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील,शितलदेवी मोहिते पाटील,स्वरूपाराणी मोहिते पाटील.वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढून जानकर यांना विजयी केले.
चौकट :-
*विकासकामांना मतदारांचा कौल.*
खासदार धैर्यशील मोहिते पाटील.*
माढा, करमाळा,मोहोळ, सांगोला व माळशिरस येथील विजयामुळे जबाबदारी वाढली असून विकासकामे करणार्यांना मतदारांनी कौल दिला आहे.त्यामुळे भविष्यात देखील सर्वांना सोबत घेऊन मोठया प्रमाणावर विकासकामे करू. असे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.
चौकट :-
तालुक्यातील नागरिकांची विकासकामे करायची होती. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या सोबत आलो.माझ्या विजयात मोहिते पाटील यांचा मोलाचा वाटा आहे.त्यांच्या साथीने विकासकामे करू.
*उत्तमराव जानकर.*नूतन आमदार
चौकट :-
*शिवरत्न वर जल्लोष.*
विजयानंतर भव्य रॅली काढून उत्तमराव जानकर यांनी शिवरत्न ला भेट दिली.तेथे त्यांनी सहकार महर्षी यांच्या समाधी चे दर्शन घेतले.तेथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.अकलूज आणि परिसरात फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.