पत्रकार गणेश जाधव लोकसभेच्या रिंगणात
अकलूज (प्रतिनिधी) : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते गणेश लक्ष्मण जाधव हे माढा मतदार संघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असून, आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेबरोबरच मराठा समाजासाठी माढा मतदारसंघातून झालेल्या लोकसंपर्काच्या जीवावर आपण यशस्वी होऊ असा दावा गणेश जाधव यांनी केला आहे.
गेली सुमारे तीस वर्षे राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील समस्यांवर आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून प्रहार करत दबलेल्या पिचलेल्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले आहे.
पत्रकारितेचा वसा जपताना अनेकदा धनदांडग्यांनी आमिषे दाखवली व आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी न पडता सत्याची बाजू घेत जीवावर बेतले तरी त्याची पर्वा न करता अनेकांना न्याय मिळवून दिला. त्याचबरोबर ज्या दिनदुबळ्यांसाठी पत्रकारितेची लेखणी चालवली त्यांच्याकडूनही कोणती अपेक्षा न ठेवता कार्य केले.
त्यामुळे माढा मतदारसंघातील सर्व जाती-धर्माच्या लोकांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडून त्यांना न्याय व लाभ मिळवून दिला.समाजातील व्यसनाधीनता, अवैध धंदे, गौण खनिज उपशामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, अनेक गावातील कचरा व्यवस्थापन तसेच महिलांसाठीच्या अनेक प्रश्नांवर आवाज उठवित विविध योजना राबविल्या. जागतिक तापमान रोखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धनासाठी विविध ठिकाणी प्रयत्न केले.
त्याचप्रमाणे शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचवून प्रत्यक्ष लाभ देखील मिळवून दिला.सामाजिक बांधिलकी जोपासून आजपर्यंत सुमारे 60 वेळा उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे.
त्याचबरोबर कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळवून दिले. आणि बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला.
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून 2016 पासून चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला आहे. अनेक मोर्चात सामील होऊन आमरण उपोषण देखील केले. या पुढील काळात देखील मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनखाली प्रामाणिकपणे काम करणार आहे.
गेली तीस वर्ष सामाजिक बांधिलकी जपत आपण माढा मतदारसंघातील हजारो व्यक्तींच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे आजपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही व्यक्तीकडून वैयक्तिक स्वार्थ न साधता समाजाच्या हिताचे कार्य केले असून माढा मतदारसंघातील मराठा समाजाबरोबरच सर्व जाती धर्माच्या हजारो लोकांनी कडून या लोकसभेसाठी एक मत मिळावे.अशी अपेक्षा व्यक्त करीत माढा लोकसभेसाठी उभा राहत असल्याचे गणेश जाधव यांनी जाहीर केले.