हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त अकलूज येथे *रयतेचा राजा- राजा शिवछत्रपती महानाट्य.*…….

अकलूज(प्रतिनिधी) माळशिरस तालुक्याचे जाणते राजे जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त दिनांक ०२ व ०३ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता रयतेचा राजा- राजा शिवछत्रपती या महानाट्याचे आयोजन केले असून याची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
यावेळी सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील प्रमुख उपस्थितीत होते.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती अकलूज, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना कामगार वर्ग यांचे वतीने विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकूल, अकलूज येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सहकार्यांच्या जीवनावर आधारित १८ वास्तववादी घटनांचा समावेश असणारा ज्वलंत इतिहास रयतेचा राजा- राजा शिवछत्रपती या महानाट्याच्या रुपाने लाखो रसिकांना पाहण्यास मिळणार आहे.
या महानाट्यासाठी क्रीडा संकुल येथे १२५ फुट लांब व ७० फुट रुंद असा भव्य रंगमंच उभारला आहे. या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत चित्रपट कलावंत शंतनू मोघे, जिजाऊंच्या भुमिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य, बाजीप्रभूंच्या भुमिकेत अभिनेते रवींद्र कुलकर्णी आणि अफजल खानाच्या भूमिकेत अभिनेते विश्वजीत फडते यांच्यासह स्थानिक ९००हून अधिक कलाकारांचा समावेश आहे.
याचे लेखक युवराज पाटील, दिग्दर्शक अभिनेते अजय तपकिरे,सुत्रधार डॉ. विश्वनाथ आवड आहेत. या महानाट्यात घोडे, बैलगाड्या, पायदळ, मावळे दिसणार आहेत. या महानाट्यात शिव जन्मापासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्यापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहकार्यांच्या शौर्याची गाथा उलगडणार आहे.
या दोन दिवसांच्या महानाट्यासाठी सुमारे एक लाखहून अधिक रसिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. यासाठी क्रीडा संकुल येथे महिला व पुरुष अशी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या महानाट्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, सदस्या मा. कु. स्वरुपाराणी मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, यांच्या नेतृत्वाखाली विविध कमिट्या कार्यरत असून क्रीडा संकुल येथे याची जय्यत तयारी सुरु आहे.
यावेळी सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील उपस्थित होते.
पार्श्वभूमी:-
शिवप्रभुच्या कार्यकतृत्वाला मानाचा मुजरा करीत असताना १९७४ साली म्हणजे पन्नास वर्षे आगोदर सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांनी ३०० वा राज्याभिषेक सोहळा आयोजित केला होता.
छत्रपती शिवरायांचा आदर्श मानून वाटचाल करणारे मा. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा यांनी समस्त अकलूजकरांच्या साक्षीने किल्याचा जिर्णोध्दार करून मरगळलेल्या मनात उत्साह भरला होता. आजपर्यत शिवाजी महाराजांचे कार्यकतृत्व समाजासमोर मांडण्यासाठी मा. बाळदादांनी जाणता राजा या महानाटयाचे २२ वेळा आयोजन केले.
गड आला पण सिंह गेला या लघुनाटयाचेही सादरीकरण केले, छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारीत असलेली शिवसृष्टी उभारण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.सन २०१९ साली ‘रयतेचा राजा : राजा शिवछत्रपती’ या महानाटयाचे आयोजन केले. ६ जुन २०२२ रोजी शिवपार्वती मंदिर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळा पुर्नस्थापना सोहळ्याचे त्यांनी आयोजन केले. सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,कला व क्रीडा क्षेत्रात मा. बाळदादांनी अनेक भव्य उपक्रमांचे आयोजन करून यशस्वी केले आहे.
यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पुर्ण होत आहेत त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ‘रयतेचा राजा : राजा शिवछत्रपती’ हे भव्य- दिव्य महानाट्य साकारले जाणार आहे.