अकलूज शहरात खुलेआम झाडाची कत्तल नगरपरिषदेकडून अर्थपूर्ण व्यवहार झाल्याची नागरिकांतून चर्चा
अकलूज (प्रतिनिधी )’ग्लोबल वॉर्मिंग’चे नाव पुढे करत संपूर्ण प्लास्टिक बंदी करणारी अकलूज नगर परिषद आंब्यांच्या झाडाची कत्तल करते.
या बाबत विचारपूस केली असता, धातुरमातूर कारणे सांगितली जात आहेत. प्लास्टिक विक्री बाबत दंड करणारी नगरपरिषद झाडे तोडणाऱ्याला साथ देते. यामुळे जनतेत नगरपरिषदेच्या अधिकार्यांनी अर्थपूर्ण व्यवहार केल्याची चर्चा चालू आहे.
सुमारे तीन वर्षांपूर्वी अकलूज ग्रामपंचायतचे नगरपरिषदेत रूपांतर झाले. त्यानंतर कोणत्याही सुखसोयीत वाढ तर झाली नाहीच.मात्र अकलूजकर मिळकतकर, पाणीपट्टी व्यापारी गाळे यावर व्याज वसुलीने त्रस्त झाले. त्यातच नगर परिषदेने प्लास्टिक बंदी जाहीर करून कॅरीबॅग विकणाऱ्या व्यापाऱ्यांना वेठीस धरून दंड आकारणी केली. कचरा कुंड्या बंद करून घरोघरी कचरा गोळा करणेसाठी वाहने खरेदी केली मात्र ती कधीच वेळेवर नागरिकांकडे जात नाहीत.
सुमारे दीड महिना उपोषण करून मिळवलेल्या नगरपरिषदेने सुखसोयी ऐवजी प्रत्येक थरातील नागरिकांचा त्रास वाढवला आहे. एकीकडे ग्लोबल वॉर्मिंगवर मात करण्यासाठी प्लास्टिक बंदी, वृक्षारोपण करत असल्याचा आव आणणारी तसेच सामान्यांनी झाड तोडल्यास ताबडतोब दंड करणारी नगरपरिषद, अकलूज येथील तलाठी कार्यालय परिसरात इरिगेशन च्या हद्दीत असलेल्या सुमारे 50वर्षाच्या आंब्याच्या झाडाला आंबे लागले असताना ते तोडण्यास मात्र परवानगी देते. शिवाय स्वतः ते कापण्यास मदत करते.
हे पाहून नियम कशाही पद्धतीने वापरणाऱ्या अधिकाऱ्यांनी अर्ध पूर्ण व्यवहार केला असल्याचा आरोप करीत आता या अधिकाऱ्यांना कोण दंड करणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

याबाबत नगरपरिषदेची संपर्क साधला असता, त्या झाडावर बुरुड आला असल्याचे थातूरमातूर कारण सांगत आहेत. तसेच तक्रारी आल्याचे सांगत आहेत.वास्तविक हे झाड तोडल्यानंतर अनेकांनी तेथील आंबे गोळा करून खाण्यासाठी नेले. तर अनेकांनी तिथे असलेला लाकूड फाटा गोळा करून नेला.

