*प्रताप क्रीडा मंडळाच्या बुद्धिबळ स्पर्धेत उच्चांकी ११२५ खेळाडूंचा सहभाग*.
(अकलूज प्रतिनिधी)
प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्यावतीने श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने आणि जयसिंह मोहिते-पाटील व मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाटचाली निमित्त रविवार, २८ जुलै रोजी स. म. शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर, अकलूज येथे आयोजित केलेल्या ‘रत्नाई चषक’ राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र चेस असोसिएशन चे जॉईंट सेक्रेटरी व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, राष्ट्रीय बाल खेळाडू अनन्या बाळापुरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी प्रदीपराव खराडे पाटील, उपाध्यक्ष पोपट भोसले-पाटील, प्राचार्य प्रवीण ढवळे, सचिव बिभीषण जाधव, स्पर्धा प्रमुख अभिजित बावळे व मंडळाचे सर्व संचालक,सदस्य उपस्थित होते. मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. या स्पर्धेचा उदघाटनपर सामना राष्ट्रीय बाल खेळाडू अनन्या बाळापुरे विरुद्ध सकीना शेख यांच्यात होऊन स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी अध्यक्षीय मनोगतात भरत चौगुले म्हणाले की, अकलूज हे बुद्धिबळ स्पर्धेचे भारतातील मोठे केंद्र होऊ शकते. प्रताप क्रीडा मंडळाने आयोजन केलेल्या स्पर्धेचा प्रतिसाद व नियोजन पाहता अशी स्पर्धा अद्याप कुठेही पाहिली नसून यामुळे मी भारावून गेलो आहे. सद्या जगात १९१ देश खेळत आहेत. अकलूजला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेण्यासंदर्भात मी असोशिएशन कडे शिफारस करणार असल्याचे सांगितले. मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते पाटील या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, प्रताप क्रीडा मंडळाच्या माध्यमातून १९९४ पासून गेली तीस वर्ष स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, मुंबई, लातूर, धाराशिव आदी जिल्ह्यातून ११२५ खेळाडूंनी उच्चांकी सहभाग घेतला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी छंद जोपासणे ही काळाची गरज आहे. स्पर्धेतील हार-जीत यापेक्षा सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
ही स्पर्धा १० वर्षे वयोगट, १६ वर्षे वयोगट व खुला गट अशा तीन गटांसाठी आयोजित केली आहे. वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळी परितोषिके व मेडल्स ठेवलेली आहेत. या स्पर्धेत उत्कृष्ट पुरुष व महिला पालक, सर्वात लहान व ज्येष्ठ खेळाडू आणि सर्वाधिक सहभाग शाळा, क्लास यांना स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी ६० कॅश प्राईज, १०१ ट्रॉफीज, १०१ मेडल तसेच प्रत्येक गटात ६० पेक्षा अधिक बक्षिसे ठेवलेली आहेत. खेळात पालकांचा सहभाग वाढावा आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ३ महिला व पुरुष पालकांना स्वतंत्र बक्षीसेही देण्यात येणार आहेत. याशिवाय माळशिरस तालुक्यातील खेळाडूंनाही संधी मिळावी याउद्देशाने तिन्ही गटामध्ये तालुक्यातील खेळाडूसाठी स्वतंत्र बक्षिसे देत आहेत.
प्रास्ताविक स्पर्धा प्रमुख अभिजित बावळे यांनी केले. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी , राजकुमार पाटील यांनी केले.


