कुल्लू जिल्ह्यात पॅराग्लायडिंग करताना मूळ अकलूज येथील रहिवाशी असलेले सुरज संजय शहा यांचा दुर्दैवी मृत्यू
अकलूज (प्रतिनिधी )कुल्लू जिल्ह्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोलीस स्टेशन पाटलीकुहल येथून मिळालेल्या माहितीनुसार, पायलटने पॅराग्लायडिंग साईटवरून उड्डाणं केले. मात्र थोड्या अंतरावर गेल्यावर ग्लायडरचा अपघात झाला. याबद्दल अधीक माहिती अशी की,हिमाचल प्रदेश मधील कुल्लू जिल्ह्यातील डोभी पॅराग्लायडिंग साइटवर पॅराग्लाय डिंग दरम्यान झालेल्या अपघातात पुण्यातील एका पर्यटकाचा मृत्यू झाला. शनिवारी 24डिसेंबर रोजी संध्याकाळी उळी खोर्यातील देवगड ग्रामपंचायती जवळील भाटगरण येथे हा अपघात झाला. या अपघातात पॅराग्लायडरचा पायलटही जखमी झाला आहे. त्याच्यावर कुल्लू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील कारवाई सुरू आहे.


पायलटवर उपचार सुरू :
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील शिरवळ खंडाळा येथे राहणारा सूरज संजय शहा (वय 30वर्षे )हा पॅराग्लायडिंगसाठी कुल्लूला गेला होता. पॅराग्लायडरने हवेत उड्डाण केले, त्याच वेळी पॅराग्लायडरचा पट्टा उघडला. त्यामुळे सर्व पर्यटक खाली पडले. अपघातानंतर स्थानिक लोकांनी पर्यटक आणि पायलटला गंभीर अवस्थेत कुल्लू रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी पर्यटकाला मृत घोषित केले. तर पायलटवर कुल्लू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला तरुण सुरज संजय शहा हा मूळ पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा येथील आहे. काही वर्षांपूर्वी मुलाचे आजोबा गोपाळदास माणिकदास शहा हे व्यवसायाच्या निमित्ताने अकलूज येथे आले. त्यानंतर त्यांनी अकलूज येथे आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपला मुलगा संजय शहा यांना व्यवसायासाठी पुणे जिल्ह्यातील शिरवळ येथे पाठविले. संजय गोपाळदास शहा यांचे अकलूज मध्ये कृषि उत्पन्न बाजार समिती च्या गाळ्यात पुष्पराज नावाचे फर्म देखील आहे. त्यांचा मुलगा सुरज हा बेंगलोर येथे चांगल्या कंपनीत नोकरीं करीत होता. परंतु सुरज याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याच्या पाठीमागे आजोबा, आजी, आई -वडील, दोन चुलते असा मोठा परिवार आहे.त्याच्या अकस्मात मृत्यू मुळे पुणे जिल्हा, अकलूज परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान त्यांचेवर 26डिसेंबर रोजी सकाळी 9वाजता पुणे जिल्ह्यातील शिरवळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
दोषींवर कायदेशीर कारवाई :
घटनेची माहिती मिळताच कुल्लू पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी पर्यटकाचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे . या अपघातात एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरुदेव शर्मा यांनी दिली. रविवारी या पर्यटकाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पर्यटकाच्या नातेवाईकांना याबाबत कळवण्यात आले आहे. कुल्लू पोलिसांनी या अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळला, त्याच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल.
